
सोलापूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) सोलापूर शहराचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर तलावात अलीकडे मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.
प्राथमिक तपासणीत तलावातील पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (Dissolved Oxygen - DO) प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता ही जलचरांसाठी घातक ठरते, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेची दखल घेत महापौर विनायक कोंड्याल, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांसह तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाण्याची गुणवत्ता, मृत माशांची स्थिती, स्वच्छता उपाययोजना आणि तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
युद्धपातळीवर उपाययोजना सुरू
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तलावातील विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत सखोल रासायनिक व तांत्रिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त विद्यमाने आठ एअरेटर कारंजे तातडीने सुरू करण्यात आले आहेत. तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून मृत मासे तातडीने हटविण्याचे काम सुरू आहे.महापालिकेने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तलावातील पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड