
सोलापूर, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २ एप्रिलपासून सुरु होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पदवी व पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकीसह २८४ अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे.पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होते. अन्य विद्यार्थ्यांची परीक्षा १०९ केंद्रांवर होईल. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बार्शी विभागासाठी एक, सोलापूर शहर परिसरासाठी एक आणि उर्वरित ग्रामीण भागासाठी एक असे एकूण तीन भरारी पथके असणार आहेत. परीक्षा तीन सत्रात होणार असून पहिले सत्र सकाळी नऊ ते ११, दुसरे सत्र दुपारी १२ ते तीन आणि तिसरे सत्र दुपारी तीन ते सायंकाळी सहा, असे असणार आहे. दरम्यान, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर व केंद्रातील वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संलग्नित १०९ उच्च महाविद्यालयांशी त्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला आहे. केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भातील अहवाल विद्यापीठास सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनस्क्रिन पद्धतीने तर उर्वरित अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाईन तपासले जातील. २०२६-२७ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरु करण्याचे नियोजन देखील विद्यापीठाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड