
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी मान्यताप्राप्त शासकीय घटक कृषि तंत्र विद्यालय, अंबाजोगाई तसेच सोनाजीराव क्षीरसागर कृषि तंत्र विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कृषि विद्यापीठ बीड जिल्हास्तरीय आंतर कृषि तंत्र विद्यालयीन क्रीडा महोत्सव 2026' संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवात सोनाजीराव क्षीरसागर कृषि तंत्र विद्यालयाच्या खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत कबड्डी, खो-खो व रस्सीखेच या सांघिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात गोळफेक व 400 मीटर धावणे यास्पर्धांमध्येही प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. हा क्रीडा महोत्सव केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर अन्नतंत्र व कृषि महाविद्यालयात पार पडला. उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजेंद्र लोंढे उपस्थित होते. तसेच श्री अनंत कृषि विकास प्रतिष्ठाणचे सहसचिव डॉ. गोविंद साळुंके, प्रा. डॉ. मधुकर खळगे उपस्थित होते. याच प्रसंगी केएसके कृषि महाविद्यालयाची विद्यार्थिनी रेणुका बागलाने हिची कृषि उपसंचालक पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ. काळे, डॉ. चौघुले, डॉ. घोडके, डॉ. आवारे, राहुल बन यांनी काम पाहिले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis