नाशिकमध्ये वेग, कौशल्य अन् थराराचा जल्लोष!
ब्लू बॅंड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये कार कौशल्याची कमाल नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.) वळणावळणाचे डांबरी रस्ते, अचानक समोर येणारे उंचवटे, कारचालकांचे अचूक नियंत्रण आणि क्षणाक्षणाला वाढणारा वेग – या साऱ्यांच्या संगमातून न
नाशिकमध्ये वेग, कौशल्य अन् थराराचा जल्लोष!


ब्लू बॅंड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये कार कौशल्याची कमाल

नाशिक, 27 फेब्रुवारी (हिं.स.) वळणावळणाचे डांबरी रस्ते, अचानक समोर येणारे उंचवटे, कारचालकांचे अचूक नियंत्रण आणि क्षणाक्षणाला वाढणारा वेग – या साऱ्यांच्या संगमातून नाशिककरांनी भरभरून थरार अनुभवला.

ब्लू बॅंड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्रच्या सहाव्या फेरीच्या सुपर स्पेशल स्टेजमध्ये विजेतेपदाचा प्रमुख दावेदार डीन मस्कारेनहास, उपविजेतेपदाचे दावेदार कर्णकदूर, तसेच आदित्य ठाकूर यांनी आपल्या कौशल्याची पराकाष्ठा दाखवली. प्रेक्षकांकडून त्यांना टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त दाद मिळाली.ग्रेप कौंटी इको रिसॉर्ट अँन्ड स्पा परिसरात नाशिककरांसाठी विशेषत: या सुपर स्पेशल स्टेजचे आयोजन करण्यात आले होते. २.१० किमी लांबीच्या या स्टेजवर चालकांसाठी खरी कसोटी होती. तीव्र वळणे, वेगात घेतलेले कट्स आणि उंचवट्यांवरून कारची अचूक उडी प्रत्येक क्षणी चालकांचे कौशल्य अधोरेखित करत होती.

अव्वल चालकांच्या नावाने नाशिककर “जयकारा” करत, टाळ्या वाजवत, प्रोत्साहन देत दिसले. दोन गाड्यांमधील समांतर झुंज प्रेक्षकांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. प्रत्येक वळणावर चालकांनी दाखवलेले धाडस आणि संतुलन नाशिककरांनी कौतुकाने साजरे केले.यंदाची आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्र ही **विसाचे रौप्य महोत्सवी वर्ष** साजरे करण्यासाठी खास आयोजित होती. सपकाळ नॉलेज हब हे रॅलीचे मुख्यालय होते. सकाळी सर्व खेळाडूंच्या कागदपत्रांची तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी करण्यात आली.

ब्लू बॅंड प्रमोटर असून विसा मुख्य आयोजक आहे. एमआयएम, ग्रेप कौंटी, सपकाळ नॉलेज हब, माय एफ, श्री रामकृष्ण हॉस्पिटल, पीएबीएस हे सहप्रायोजक आहेत. सुपर स्पेशल स्टेजसाठी नाशिककरांनी दिलेली दाद या रॅलीची खरी कमाई ठरली.वेग, कौशल्य आणि थरार यांचा संगम घडवणारी ही स्पर्धा नाशिककरांसाठी अभिमानाची ठरली. उद्या (ता. २८) सकाळ व दुपार सत्रात त्र्यंबकेश्वर आणि पालघर भागात अवघड घाट वळणाच्या डांबरी रस्त्यावर पुन्हा या नावाजलेल्या चालकांचे कौशल्य पाहायला मिळणार आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande