
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.) : शहरातील पाथरी रस्त्यावरील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे जिल्ह्यात प्रथमच अत्याधुनिक ऑटिझम व बाल विकास विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून लहान मुलांमधील भाषा विकासातील अडचणी, बोलण्यात उशीर, उच्चारातील त्रुटी, तोतरेपणा तसेच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर यांसारख्या समस्यांचे मोफत मूल्यमापन व तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
या सुविधेमुळे परभणी व परिसरातील पालकांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद किंवा मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्याने पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्पीच थेरपीद्वारे मुलांच्या बोलणे, भाषा व संवाद कौशल्यांचा विकास साधला जाणार आहे. ० ते ६ वर्षे हा भाषा विकासासाठी महत्त्वाचा कालावधी मानला जातो. वेळेवर निदान व उपचार केल्यास शालेय आणि सामाजिक अडथळे टाळता येतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. या विभागाची जबाबदारी तज्ज्ञ रजत सारडा यांच्याकडे असून पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis