
बीड, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।
जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावूया आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. निवेदन जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना पाठविण्यात आले आहे.
दि.७ ऑगस्ट २०२५ रोजी
तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्षलागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले गेले.
मात्र प्रत्यक्षात १० टक्केही झाडे जिवंत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशीची मागणी करत विविध आंदोलने करण्यात आली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
विधानसभेत आ. चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, त्यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्षलागवड झाल्याचे आणि त्यापैकी ९६ टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले. या विधानामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासन व सभागृहाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले.
डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis