
अमरावती, 27 फेब्रुवारी (हिं.स.) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाने अध्यापन, संशोधन आणि भाषा संवर्धनाच्या उपक्रमांमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. गुणवंत विद्यार्थी, संशोधनपर कार्य आणि विविध साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून विभागाने राज्यस्तरावर नाव कमावले असून मराठी भाषा व साहित्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठी विभागाची स्थापना १९९४-१९९५ मध्ये झाली. सध्या विभागात एम. ए. (मराठी) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून १० संशोधक विद्यार्थी कार्यरत आहेत. या विभागातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक झालेत. कवी, लेखक, सूत्रसंचालक, वक्ते, विचारवंत म्हणून समाजात लौकिक प्राप्त करीत आहेत. मराठी विभागाने वऱ्हाडी बोली, कोरकू लोककला व लोकसंस्कृती, मराठी विज्ञान साहित्य या विषयांवर बृहद् संशोधन प्रकल्प राबविले. मराठी विभागातील प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये कर्मयोगी गाडगेबाबा, संत तुकाराम : व्यक्तित्व आणि कवित्व, आस्वादनामा, नारायण सुर्वे यांची कविता, अर्वाचीन कवींचा काव्यविचार, पळसबंध, कृषी साधनांचा कोश, देवधर्म आणि माणूस, साहित्य आणि समाज : आकलन आणि अन्वयार्थ, गाव आणि शिवार, अन्वय, साठोत्तरी साहित्यप्रवाह : साहित्यप्रवाह आणि दिशा, चोखामेळा : संत कवी आणि माणूस इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. मराठी विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्यात प्रामुख्याने कवी केशवसुत काव्यस्पर्धा, अभिजात मराठी भाषा सप्ताह, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरवदिन यांचा समावेश होतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे, डॉ. माधव पुटवाड आणि डॉ. प्रणव कोलते यांच्या प्रयत्नांमुळे मराठी विभागाची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी