
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)।सन 1986-87 मध्ये परभणी येथे झालेल्या पोलीस भरतीत दाखल झालेल्या प्रशिक्षणार्थी बॅचमधील सर्व 50 सेवानिवृत्त पोलीस बांधवांनी एकत्र येत ‘स्मृतिगंध मैत्री’चा स्नेहमेळावा पाथरी रोडवरील सरदेशपांडे हुरडा पार्टी परिसरात जल्लोषात साजरा केला. अनेक वर्षांनंतर प्रथमच एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा ऐतिहासिक सोहळा ठरला.
शालेय जीवनानंतर मित्र एकत्र येतात, असे आपण ऐकतो; मात्र पोलीस सेवेत भरती झाल्यानंतर तब्बल चार दशकांनंतर अशा पद्धतीने राज्यात प्रथमच पोलीस बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सन 1986-87 दरम्यान परभणी येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तसेच सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र, मुंबई खंडेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माधव लोकुरवार होते. विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक गोपीनाथ सरोदे, सेवानिवृत्त राखीव पोलीस दल निरीक्षक गंगाधर टाकरज, सेवानिवृत्त राखीव पोलीस उपाधीक्षक सय्यद मुसा, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक तथा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि या सोहळ्याचे आयोजक शिवाजीराव कोटे, तसेच संघटनेचे जिल्हा सचिव व मुख्य समन्वयक जळबाजी गायकवाड उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी 1986-87 च्या भरती बॅचमधील दिवंगत सहकार्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मुख्य अतिथी खंडेराव शिंदे यांचा सपत्नीक शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला.
आयोजक शिवाजीराव कोटे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व मित्रांना पुन्हा एकत्र आणून आनंदोत्सव साजरा करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. खंडेराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भरती झालो. त्यांच्या पारदर्शक भरती प्रक्रियेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील आम्हाला पोलीस दलात काम करण्याची संधी मिळाली. साहेबांनी आमचे निमंत्रण स्वीकारून मुंबईहून येत आम्हाला आशीर्वाद दिले, हे आमचे भाग्य आहे.
उपस्थित सेवानिवृत्त पोलीस बांधवांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, खंडेराव शिंदे साहेबांमुळेच आम्हाला पोलीस सेवेत प्रवेश मिळाला. त्यांच्या प्रामाणिक व पारदर्शक कार्यपद्धतीमुळे आम्ही विविध पदांपर्यंत पोहोचू शकलो. सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. खंडेराव शिंदे यांनी आपल्या भाषणात भावूक होत सांगितले की, माझ्या कार्यकाळात अनेक भरती झाल्या; परंतु इतक्या वर्षांनंतर अशा प्रकारे सन्मानपूर्वक बोलावून सत्कार करण्यात येईल, याची अपेक्षा नव्हती. चांगल्या कामाचे कौतुक उशिरा का होईना होतेच. सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि मैत्रीचे ऋणानुबंध जपावेत. त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. संघटनेचे सचिव जळबाजी गायकवाड यांनी पोलीस कर्मचारी संघटनांच्या मर्यादा व अडचणींचा उल्लेख करत, सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या माध्यमातून बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis