नांदेड - पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ?
नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून या सभेत स्थायी समितीसह महिला व बालकल्याण, शिक्षण समिती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणा
नांदेड - पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ?


नांदेड, 27 फेब्रुवारी, (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून या सभेत स्थायी समितीसह महिला व बालकल्याण, शिक्षण समिती तसेच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे वृत्त आहे. कोणत्या सदस्याला कोणत्या समितीवर स्थान द्यायचे याबाबत भाजपामध्ये खल सुरू आहे. मनपा प्रशासनाने पहिल्या सर्वसाधारण सभेसाठीची आवश्यक ती तयारी देखील सुरू केली आहे.

महानगरपालिकेवर भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली असून महापौर, उपमहापौरांची निवड होवून दोन आठवड्याचा कालावधी लोटला आहे, स्थायी समिती सदस्य व अन्य विषय समित्यांची निवड अद्याप झाली नाही, येत्या आठवडाभरात या सर्व सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे, निवड केल्या जाणाऱ्या सदस्यांच्या नावाची शिफारस करावी, असे पत्र नुकतेच नगरसचिवांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पाठविले आहे.

'शिवाजीनगर कडून' सिग्नल मिळाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे गटनेत्यांकडून पाठविली जातील, असे सांगण्यात आले आहे. या अनुषंगाने भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अजून याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे.

नगरसचिव विभागाने मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेसाठीची सर्वतोपरी सज्जता केली असून पहिल्या सभेत नेमके कोणते विषय घ्यायचे याबाबत विचारविनीमय सुरू आहे. येत्या १० मार्च पूर्वी ही सर्वसाधारण सभा पार पडावी, या दृष्टीने नियोजन सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande