छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘नदीष्ट’कारांच्या सत्काराने कवीसंमेलन रंगले
छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या “मायमराठी गौरव महोत्सव” अंतर्गत कवीसंमेलन पार पडले. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अ


छत्रपती संभाजीनगर, 27 फेब्रुवारी (हिं.स.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात मराठी भाषा व वाङ्मय विभागाच्या “मायमराठी गौरव महोत्सव” अंतर्गत कवीसंमेलन पार पडले.

या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कवीसंमेलनात प्रख्यात कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर (नांदेड), संजय चौधरी (नाशिक), किरण येले (मुंबई), गीतकार प्रा. विनायक पवार (पेण), गझलकार वैभव देशमुख (पुणे) आणि सुनील उबाळे (छत्रपती संभाजीनगर) यांनी भाग घेतला. यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे, प्रा. प्रशांत अमृतकर, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य, संचालक डॉ. कैलास अंभुरे आणि ज्येष्ठ साहित्यिक ललिता गादगे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात “नदीष्ट”कार मनोज बोरगांवकर यांच्या सत्काराने झाली. बोरगांवकर म्हणाले, “विद्यापीठात शिकताना पहिल्यांदा नदी आणि तिच्या दुःख-सुख समजायला लागले, आणि त्यावर आधारित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कादंबरी लिहिता आली.”

कवीसंमेलनात विविध कवितांचा प्रवाह नदी, पाणी, गाव, बाई आणि माणसं यांच्या अवतीभोवती फिरत राहिला. भूमिपुत्र सुनील उबाळे यांनी ‘कवितेवरती कविता’ आणि ‘भुकेवरची रचना’ सादर केली. गीतकार प्रा. विनायक पवार यांनी “कुणी तोडले सखळदंड, कोणी तोडल्या बेड्या” आणि इतर दोन रचना वाचल्या. डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी नवयुवतीची कविता सादर करून उपस्थितांना गंभीरतेचा अनुभव दिला, तर किरण येले यांनी समाजातील हिंसेवर आपली रचना मांडली.

गझलकार वैभव देशमुख यांनी “‘चित्रे होती, गुंफा होती, भाषा नव्हती… तेव्हा देखील कविता होती’” या ओळींनी सुरुवात करून आपल्या गेय कवितेतून रसिकांची मने जिंकली. संजय चौधरी यांनी प्रेम कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.

कवी गणेश घुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रामेश्वर वाकणकर यांनी आभार मानले. कवीसंमेलनाच्या यशस्वितेसाठी डॉ. वाल्मिक वाघमारे, प्रा. विलास गायकवाड, हर्षाली शेवाळे यांनी महत्वाचे प्रयत्न केले.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande