
परभणी, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। एसटी महामंडळाच्या परभणी -सोनपेठ बस चालकाच्या प्रसंगावधान एकाच मार्गावर दोन दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला.
परभणी बस स्थानकातून बस क्र. एम. एच. 14 एल. एक्स. 7960 ही बस सोनपेठ कडे मार्गस्थ झाली. परभणी स्थानकातूनच बसमध्ये पाय ठेवायला जागा नसतांना जवळपास 90 प्रवासी घेऊन बस पोखर्णी गावाच्या पुढे दोन किलोमीटरच्या अंतरावर वळणावरील पुलाजवळ आल्यानंतर अचानक आवाज आला, टायर मधून धूर निघत होता, बसचे समोरील टायर फुटल्याचे चालकाच्या लक्षात येताच बसवर नियंत्रण ठेवत चालकाने प्रसंगावधान ओळखून बसचा वेग कमी-कमी करत बस थांबवली. यामुळे पुढील अनर्थ टळल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला. दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांना तब्बल दीड तास ताटकळत बसावे लागले.
शेळगाव परिसरात बसची सकाळी दुसरी घटना घडली. परभणी आगाराची सोनपेठहून बस क्र. एम. एच. 13 सी. यु. 6838 बस चाकाच्या एक्सेलचे 8 पैकी 3 नटबोल्ट निखळल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने नटबोल्ट आवळले व बस मार्गस्थ केली. बस शेळगाव टेकडीच्या चढावर येतात दोन नटबोल्ट पुन्हा निखळून पडले हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली व चाकाची तपासणी केली असता अवघ्या एका नटबोल्टवर ही बस चालल्याचे निदर्शनास आले, बस जागेवरच थांबवल्याने पुढील अनर्थ टाळला.
सोनपेठ मार्गावर सोडण्यात येणार्या बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या बस सोडल्याने व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्याने या मार्गावर अश्या नेहमीच घटना घडत आहेत.
परभणी-सोनपेठ या मार्गावर बसच्या जवळपास 28 फेर्या होतात. परभणी-सोनपेठ मार्गावर 28 थांबे आहेत. या थांब्याव्यतिरिक्त सोनपेठ, शिर्शी परिसरातील 18 ते 20 गावे या मार्गाला जोडल्या जात असल्युळे या मार्गावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. परभणी व सोनपेठ स्थानकात बस लागतातच प्रवाशांनी हाउसफुल होते. 90 ते 100 प्रवासी बसवत असल्याने ग्रामीण भागातील व दोन्ही स्थानकातून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निम्म्या प्रवाशांना तर उभे राहूनच प्रवास करावा लागतो, प्रवाशांना मात्र हे आता नित्याचेच झाले आहे. दर तासाला बस असली तरीही अनेक वेळा बस रद्द केली जाते. पूर्ण तिकीट काढूनही बसमध्ये बसायला जर जागा नसेल तर बसचा प्रवास करायचा कशाला? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
सोनपेठ मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची गरज....
परभणी आगाराला सोनपेठ मार्गावर दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. सोनपेठला दर तासाला सोडण्यात येणारी बस रात्री 9 वाजेपर्यंत शटल सेवा सुरू करावी अशी प्रवाशांची अनेक दिवसापासून मागणी आहे, परंतु या मागणीकडे संबंधित वरिष्ठ अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे. या मार्गावरून सुरू असणारी परभणी- पंढरपूर बस मागील अनेक दिवसापासून बंद करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सोनपेठहून एकही बस नाही यामुळे परभणी आगाराने लांब पल्ल्याच्या बस सुरू करून सोनपेठला दर अर्ध्या तासाला बस सोडण्यात याव्यात अशी मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis