
मुंबई, 27 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणी जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लवकरात लवकर करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, असे उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत विधानसभा सदस्य हरिष पिंपळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजी नगर यांचे मार्फत चौकशी सुरू आहे.
मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, परभणी जिल्हा बँकेतील झालेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यास रिझर्व्ह बँकेला कळवून या बँकेची परवानगी रद्द केली जाईल. तसेच अनुकंपाच्या नावाखाली गैरप्रकार झाला असल्याच्या तक्रारी आहेत, त्याची देखील चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य प्रकाश साळुंके, विजय वडेट्टीवार, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर