ठाणे - ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी उलगडले मराठी भाषेचे प्राचिनत्व
ठाणे, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) : अभिजात मराठी भाषेचा जवळपास 60 लाख वर्षापूर्वी पासून सुरू झालेला प्रवास ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी माहितीपूर्ण संशोधनातून श्रोत्यांसमोर मांडला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे महानग
ठाणे


ठाणे, 27 फेब्रुवारी, (हिं.स.) : अभिजात मराठी भाषेचा जवळपास 60 लाख वर्षापूर्वी पासून सुरू झालेला प्रवास ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांनी माहितीपूर्ण संशोधनातून श्रोत्यांसमोर मांडला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘अभिजात मराठी भाषेचे प्राचिनत्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी यांनी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीकांत बोजेवार यांचे स्वागत केले.

मराठी भाषेच्या जन्मापासून ते आजवरची विविध स्थित्यंतरे सांगतानाच मुघल, ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांच्या आक्रमण आणि राजवटीतून मराठी भाषा कशी वाचली एवढेच नव्हे तर या राजवटीतही ती कशी समृद्ध होत गेली ते श्रीकांत बोजेवार यांनी सोदाहरणासह स्पष्ट केले.

मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे द्रष्टेपण दाखविले ते सांगताना तत्कालीन मुद्रण कारखाना पोर्तुगीजांकडून महाराजांनी 167 सुवर्ण मुद्रांना विकत घेतला. परंतु सततच्या लढाई मोहिमा आणि स्वराजाच्या अन्य कामगिरीमुळे महाराजांना त्या कारखान्याला कार्यान्वित करण्यास अपयश आले पण अखेर महाराजांनी तो कारखाना एका उद्योजकाला 177 सुवर्णमुद्रांना विकला ही रंजक माहितीसुद्धा त्यांनी या व्याख्यानातून श्रोत्यांसमोर मांडली. जेणेकरुन आज 250 वर्षांची मुद्रण यंत्रणा मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

लीळाचरित्रापासून सुरू झालेली ग्रंथसंपदा आजच्या वर्तमानकालीन लेखकांनीही समृद्धीच्या उंचीवर कशी नेऊन ठेवली आहे हे सांगून त्यांनी सर्व श्रोतृवृंदाला आवाहन केले की, पेशाची भाषा कोणतीही असो, पण प्रेमाची भाषा मराठीच असू द्या असेही त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण, विज्ञान, माध्यमे आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे मराठीने नवे आयाम गाठले असून, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरही भाषेची अभिव्यक्ती अधिक समृद्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती समाजाची सांस्कृतिक स्मृती असते. तिचे जतन आणि संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे आवाहन करत बोजेवार यांनी सर्वांनीच वाचनसंस्कृती जोपासावी, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande