लातूर - अवैध कत्तलीसाठी नेण्यात येणारे १४ बैल वाचवले
लातूर, 13 मार्च, (हिं.स.)। निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटी येथे अवैधरित्या कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या १४ बैलांचे प्राण गोरक्षण कार्यकर्त्यांनी वाचवून ते किल्लारी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ लाख २
अवैध  कत्तल


लातूर, 13 मार्च, (हिं.स.)। निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटी येथे अवैधरित्या कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या १४ बैलांचे प्राण गोरक्षण कार्यकर्त्यांनी वाचवून ते किल्लारी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जावळी, उमरगा व लातूर येथील गोरक्षण कार्यकर्त्यांना लातूर ते निलंगा महामार्गावरून बैलांची अवैध वाहतूक करून त्यांना कत्तलखान्यात नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कार्यकर्त्यांनी कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये कोंबलेले १४ बैल आढळून आले. हे बैल कत्तलीसाठी बिदरकडे नेले जात असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती तात्काळ ११२ हेल्पलाईनवर देण्यात आली. त्यानंतर किल्लारी पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. विशाल शहाणे यांच्या आदेशानुसार पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. पोलीस चालक धम्मपाल लोंढे व पोहेकॉ पंढरीनाथ सोमवंशी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंटेनर ताब्यात घेत किल्लारी पोलीस ठाण्यात आणून दिला.

या प्रकरणी बळी गोविंद मुळे (रा. जावळी, ता. औसा) यांच्या फिर्यादीवरून

१) यल्लापा शहानाप्पा (चालक)

२) व्यंकट लक्ष्मण बुई (मदतनीस)

३) मुजीब कुरेशी

४) मुन्ना कुरेशी

५) तोशीन कुरेशी (रा. औसा)

यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत १४ बैल (किंमत अंदाजे ३ लाख २ हजार रुपये) व कंटेनर (किंमत अंदाजे १० लाख रुपये) असा एकूण १३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, जप्त केलेले बैल रिंगणी (ता. औसा) येथील गोरक्षण केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि डॉ. विशाल शहाणे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande