
रत्नागिरी, 15 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरीतील राजिवडा परिसरात एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घडली. राजिवडा येथील जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४) या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला त्याने ही बाब आपल्या पालकांना सांगितली नव्हती.
दरम्यान, आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. गुरुवार, १२ मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांना सोशल मीडियावर एक व्हिडीओ दिसला. तो पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या व्हिडीओतील बालक त्यांचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पॉक्सो कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यानुसार अल्पवयीनांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या हाती घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी