पंतप्रधान मोदींचा कोकराझार दौरा रद्द
दिसपूर , 13 मार्च (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर शुक्रवारी गुवाहाटी येथे पोहोचले. मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करावा लागला आहे. पंतप्रधानांचा आज कोकराझार येथे जाण्याचा कार्यक्रम ठरला होता, पण त
पंतप्रधान मोदींचा कोकराझार दौरा रद्द


दिसपूर , 13 मार्च (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर शुक्रवारी गुवाहाटी येथे पोहोचले. मात्र खराब हवामानामुळे त्यांच्या कार्यक्रमात अचानक बदल करावा लागला आहे. पंतप्रधानांचा आज कोकराझार येथे जाण्याचा कार्यक्रम ठरला होता, पण तो आता रद्द करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिसरातील खराब हवामान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.आता ते कोकराझारमधील विकास प्रकल्पांचे उद्घाटन व्हर्च्युअली करणार आहेत. आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.मागील चार महिन्यांत त्यांचा हा चौथा आसाम दौरा आहे. या दौऱ्यात ते राज्याला ४७,६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची भेट देणार आहेत.

कोकराझारचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे पंतप्रधान ‘आसाम माला 3.0’ योजनेची सुरुवात व्हर्च्युअली करतील. या योजनेअंतर्गत ९०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार असून त्यामुळे राज्यांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. तसेच ते बोडोलँड भागात चार फ्लायओव्हर आणि दोन पुलांचे भूमिपूजनही करतील.

पंतप्रधान रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बाशबारी येथे एका वर्कशॉपची पायाभरणी करतील. याशिवाय ते तीन नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील — कामाख्या–चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, गुवाहाटी–न्यू जलपाईगुडी एक्सप्रेस आणि नारंगी–अगरतळा एक्सप्रेस. यावेळी शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात येणार आहे. पंतप्रधान देशातील ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान योजनेचा २२ वा हप्ता जारी करतील.

गुवाहाटीत पंतप्रधान चहा बागायतीतील कामगारांना जमिनीचे पट्टे प्रदान करतील, जे त्यांच्या हक्कांसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ऊर्जा क्षेत्रात ते कोपिली जलविद्युत प्रकल्प आणि उत्तर-पूर्व गॅस ग्रिडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील.शनिवारी पंतप्रधान कामाख्या मंदिरासाठी रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील आणि गुवाहाटीत पीएम एकता मॉलचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते सिलचर येथे रवाना होतील, जिथे ते सुमारे २३,५५० कोटी रुपयांच्या योजनांची सुरुवात करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande