इराण युद्धासंदर्भात भारत सरकारची भूमिका योग्य- दत्तात्रय होसबळे
पानीपत, 15 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियासह आखाती देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यापार्श्वभूमीवर वाढत्या तणावासंदर्भात भारत सरकारने देशहिताचा विचार करून योग्य भूमिका घेतल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे या
पत्रकार परिषदेत माहिती देताना दत्तात्रय होसबळे आणि सुनील आंबेकर


पानीपत, 15 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियासह आखाती देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यापार्श्वभूमीवर वाढत्या तणावासंदर्भात भारत सरकारने देशहिताचा विचार करून योग्य भूमिका घेतल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले. हरियाणाच्या पानीपत येथे आयोजित संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आज, रविवारी समारोप झाला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना होसबळे बोलत होते.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या भूमिकेसंदर्भात होसबळे यांनी सांगितले की भारत सरकार देशहित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेत आहे, याबद्दल विश्वास आहे. संघाची या विषयावर थेट भूमिका नसली तरी जगात शांतता प्रस्थापित व्हावी, ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.संघ शेजारी देशांशी सौहार्दपूर्ण संबंधांना महत्त्व देतो. अलीकडे बांगलादेश आणि नेपाळ येथे सामाजिक-राजकीय बदलांनंतर नवीन सरकारे स्थापन झाली आहेत. या देशांमध्ये शांतता आणि स्थिरता टिकून राहणे तसेच भारताशी चांगले संबंध असणे हे संपूर्ण आशियाच्या विकास आणि सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

भाजप आणि संघाच्या संबंधांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची विचारधारा भारतीय जनता पक्ष ने स्वीकारली, तर इतर अनेक पक्षांनी संघासाठी आपले दरवाजे बंद ठेवले. मात्र संघ असे मानत नाही की केवळ संघाचे स्वयंसेवकच देशभक्त असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघात मुस्लिम आणि महिलांच्या सहभागाबाबत विचारले असता होसबळे यांनी सांगितले की कोणत्याही धर्माची व्यक्ती संघात सहभागी होऊ शकते आणि भगव्या ध्वजाला प्रणाम करू शकते. मुस्लिम कार्यकर्ते यापूर्वीही संघाशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. महिलाही संघाच्या विविध उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, मात्र पारंपरिक शाखांमध्ये त्यांचा सहभाग नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

बेवारस गोधनाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की सरकार आणि महानगरपालिका प्रयत्न करत आहेत, परंतु समाजानेही जबाबदारी घ्यावी. गाय केवळ दुधासाठीच नव्हे तर शेण आणि मूत्रामुळेही उपयुक्त असल्याने तिला रस्त्यावर सोडू नये, असे त्यांनी नमूद केले.

प्रतिनिधीसभेतील प्रमुख मुद्दे

हरियाणातील पानिपत येथील माधव सृष्टी परिसरात झालेल्या या सभेत अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली.

संघाच्या शताब्दी वर्ष (2025-26) अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.

देशभरात 88,949 शाखा कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 5,820 ने अधिक आहे.

दक्षिण आणि ईशान्य भारतात संघाच्या कामाचा विस्तार करण्यावर विशेष भर देण्यात आला, विशेषतः केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये.

या बैठकीत 1,487 पदाधिकारी सहभागी झाले, तर संघाशी संबंधित 32 संघटनांनी सूचना मांडल्या.

होसबळे यांनी सांगितले की संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त तसेच गुरू रविदास यांच्या 650 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांद्वारे सामाजिक समरसतेचा संदेश दिला जात आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या रचनात्मक बदलांबाबत आणि पुढील वर्षाच्या कार्ययोजनेला सभेत मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच उत्तर भारतासाठी हरियाणातील पानिपत येथे मोठे संघकेंद्र उभारण्याची योजना आहे. हे केंद्र नागपूर येथील मुख्यालयाच्या धर्तीवर विकसित केले जाणार आहे. दिल्ली जवळ असल्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांशी समन्वय साधणे अधिक सोपे होईल असे त्यांनी सांगितले.

पुढील दोन वर्षांसाठी विशेष लक्ष

संघाने पुढील दोन वर्षांत आपले कार्य वाढवण्यासाठी केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि पश्चिम बंगाल राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे: पंजाबमध्ये शीख समाजाशी संवाद वाढवण्यासाठी राष्ट्रीय शिख संघ पुन्हा सक्रिय करण्याची योजना आहे. त्यासाठी पुढील उपक्रम प्रस्तावित करण्यात आले:

घरोघरी संपर्क मोहीम राबवून शीख कुटुंबांशी संवाद वाढवणे

महिलांसाठी ‘ममता संगम’ कार्यक्रमांचे आयोजन

तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी नशामुक्ती मोहीम

परदेशात स्थायिक पंजाबी व शीख समुदायाशी संपर्क वाढवण्यासाठी ‘पंच प्रभुदन’ उपक्रम

-------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande