
तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप
कोलकाता, 14 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिगेड रॅलीपूर्वी मोठा गोंधळ आणि हिंसाचार झाल्याची घटना समोर आली आहे. गिरीश पार्क परिसर काही काळ रणांगणात बदलला होता. रॅलीसाठी जात असलेल्या भाजप समर्थकांच्या वाहनांवर पोलिसांच्या उपस्थितीतच विटा-दगडांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत अनेक भाजप समर्थक जखमी झाले असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात भगदडही उडाली. रॅलीपूर्वी ब्रिगेड मैदानाजवळील रस्त्यांवर लावण्यात आलेले पंतप्रधानांचे अनेक कटआउट फोडण्यात आले. तसेच कोलकात्यातील व्हीआयपी रोडसह अनेक ठिकाणी “मोदी गो बॅक” असे लिहिलेले होर्डिंग्जही लावण्यात आले होते. दुसरीकडे, मेदिनीपूर जिल्ह्यातील नारायणगढ विधानसभा क्षेत्रातून ब्रिगेड रॅलीसाठी येत असलेल्या भाजप समर्थकांच्या बसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व घटनांबाबत भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत.पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील विविध भागांत पोस्टर, बॅनर आणि कटआउट लावले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून तृणमूल काँग्रेसनेही स्वतःचे पोस्टर लावले आहेत. शनिवारी ब्रिगेड मैदानातील सभेपूर्वी एक्साइड मोडजवळ फुटपाथवर एका कटआउटचे डोके तोडलेले दिसून आले, तर त्याचा तुटलेला भाग खाली जमिनीवर पडलेला आढळला.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी