
नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.)। पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा अधिक खर्च करावा लागणार आहे. केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फास्टॅग वार्षिक पासच्या किमतीत 2.5 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत 3,000 रुपयांत मिळणारा हा पास आता 3,075 रुपयांना मिळणार आहे. या पासच्या माध्यमातून कारधारकांना देशातील निवडक टोल प्लाझांवर थांबण्याची गरज न पडता सहज प्रवास करता येतो.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फास्टॅग वार्षिक पास सुरू करतानाच त्याच्या अधिसूचनेत दरवर्षी किमतींचे पुनरावलोकन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसारच यंदा वार्षिक पुनरावलोकन करताना 2.5 टक्के वाढ करण्यात आली आहे. देशभरातील महामार्गांवरील टोल दरांमध्ये बदल करण्यासाठी जे निश्चित सूत्र वापरले जाते, त्याच आधारावर ही वाढ करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारने हा विशेष वार्षिक पास 15 ऑगस्टपासून सुरू केला होता आणि त्याला वाहनचालकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत देशभरातील 52 लाखांहून अधिक कारधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा पास अत्यंत किफायतशीर मानला जातो. या पासचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका वर्षात कितीही वेळा रिचार्ज करता येतो, त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या चालकांना मोठा फायदा होतो.
दरम्यान, वाहनधारकांना जुन्या दरात पास घेण्याची संधी अद्याप उपलब्ध आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, जे वापरकर्ते 31 मार्चपर्यंत आपला पास रिचार्ज करतील किंवा नवीन पास खरेदी करतील, त्यांना तो 3,000 रुपयांच्या जुन्या दरातच मिळेल. मात्र 1 एप्रिलच्या सकाळपासून सिस्टममध्ये नवीन दर लागू केले जाणार असून त्यानंतर पाससाठी 3,075 रुपये मोजावे लागतील.
सध्या हा वार्षिक पास देशातील प्रमुख 200 टोल प्लाझांवर वैध आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल नाक्यांवर थांबण्याची गरज राहत नाही आणि वेळेची बचत होते. तसेच वारंवार टोल टॅक्स कापण्याच्या त्रासातूनही वाहनधारकांना दिलासा मिळतो. भविष्यात या योजनेचा विस्तार करत आणखी टोल प्लाझांचा समावेश करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळण्याबरोबरच महामार्गांवरील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule