
मुंबई, 15 मार्च (हिं.स.)। येथील धारावी परिसरात एका ५८ वर्षीय भंगार विक्रेत्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आपल्यावर जादूटोणा करते, या संशयातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमृत मेघा सोलंकी (५८) हा धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत पत्नी सूरजबेन सोलंकी (५२) यांच्यासोबत राहत होता. १३ मार्च रोजी दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. घरातील वादातून संतापलेल्या अमृत सोलंकीने प्रथम पत्नीच्या डोक्यात पाण्याची बाटली मारली आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. घटनेनंतर घरातच रक्ताच्या थारोळ्यात सूरजबेन पडून राहिल्या.
या प्रकरणात दाम्पत्याचा मुलगा शिवराम सोलंकी (३३) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून वडील आईवर जादूटोण्याचा संशय घेत होते आणि सतत तिचा छळ करत होते. “आई आणि मुले मिळून माझ्यावर करणी करत आहेत,” असा अमृत सोलंकीचा समज होता. त्यामुळे त्याने मुलांनाही घरात येण्यास मनाई केली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात “एक दिवस मी तुझ्या आईला मारून टाकीन,” अशी धमकीही त्याने दिली होती.
बुधवारी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी वडिलांना घेण्यासाठी शिवराम घरी गेला असता घर आतून बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. अनेकदा हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने वडिलांना फोन केला. त्यावेळी अमृतने व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. कॉल सुरू होताच अमृत रक्ताने माखलेला दिसत होता. त्याने कॅमेरा फिरवून पत्नीचा मृतदेह दाखवत “मी तुझ्या आईला बाटलीने मारून गळा दाबून संपवले,” असे सांगितल्याने शिवराम हादरून गेला.
शिवरामचा आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना माहिती दिली. धारावी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सूरजबेन यांना सायन रुग्णालय येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी अमृत सोलंकीला ताब्यात घेतले असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule