
अमरावती, 17 मार्च (हिं.स.)।
जिल्हा बालविवाहमुक्त करण्याच्या दृष्टीने जानेवारी महिन्यांपासून विशेष अभियान प्रशासनाकडून सुरू केले असले तरी, हे प्रकार थांबलेले नाही. मंगरूळदस्तगीर हद्दीत बालविवाह लावून देणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मंगरूळदस्तगीर हद्दीत येरला समाजमंदिरात ही घटना घडली. एक मुलगी १८ वर्षांची पूर्ण असल्याचा दावा तिच्या नातेवाइकांनी करून तिचे लग्न जिल्ह्यातील एका गावातील युवकासोबत जुळविले. लग्नाचा सोहळा येरली समाजमंदिरात करण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे मुलगी व मुलीकडील बरेच नातेवाईक लग्नासाठी जमले होते. गावातील पोलिस पाटील गौरव श्रीपाल झोपाटे (वय ३८) यांच्या ही बाब निदर्शनात आली. त्यांनी मंगरूळदस्तीगर पोलिसांत तक्रार केली. प्रकरणी पोलिसांनी दोन इसमांसह दोन महिला, अशा चौघा नातेवाइकांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. १६ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती जिल्ह्यातील परतवाडा ठाण्यात दाखल अन्य दुसऱ्या घटनेत, गर्भवती अल्पवयीन मुलीच्या (वय १६) तक्रारीवरून एका युवकाविरुद्ध (वय १९) अपहरण, अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायदा (पोक्सो) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित अल्पवयीन मुलीला संशयित युवकाने लग्नाचे व प्रेमाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे तिला सहा महिन्यांची गर्भधारणा झाली, असे पीडितेने तक्रारीत आरोप केला आहे.
मेळघाटात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येत असल्याने जनजागृतीसाठी एक चित्ररथ आठवड्यापासून सुरू करण्यात आला. प्रत्येक विभागाच्या यंत्रणांची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केली असून, येत्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. -अजय डबले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, अमरावती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी