
अकोला, 17 मार्च, (हिं.स.)। अकोला महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर यांनी आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी पीएम श्री मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 26, शिवसेना वसाहत, अकोला येथे भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी विशेषतः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत इटकर सरांनी त्यांना पुढील शिक्षणातही सातत्य ठेवण्याचे व अधिक मोठी उद्दिष्टे गाठण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती, अडचणी व भविष्यातील ध्येयांविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी लवकर तयारी करण्याचे तसेच नियमित अभ्यास, शिस्त व आत्मविश्वास यांचा अंगीकार करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
शाळेतील शैक्षणिक वातावरण, वर्गनियोजन, विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपक्रम राबविण्याची पद्धत याबाबत समाधान व्यक्त करत वर्ग शिक्षक विनय वाघ यांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षेत यश मिळवले असल्याचे नमूद करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू अवधूत यांच्या नेतृत्वाखाली शाळेत सुरू असलेल्या शैक्षणिक व गुणवत्तावाढीच्या उपक्रमांचेही त्यांनी अभिनंदन केले. भेटीदरम्यान शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सूचना देत शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यावर भर देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा परीक्षा, उपक्रम व कौशल्याधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कुणबी विकास मंडळाचे शहर अध्यक्ष राजेश गावंडे, शाळेतील शिक्षक योगेश सपकाळ, चंद्रकांत देशपांडे तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे