नंदुरबारमध्ये ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ प्रदर्शन 20 मार्चपासून
नंदुरबार, 18 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तेजस्वि
नंदुरबारमध्ये ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ प्रदर्शन 20 मार्चपासून


नंदुरबार, 18 मार्च (हिं.स.) जिल्ह्यातील महिला बचत गट आणि शेतकरी गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तेजस्विनी कृषी संस्कृती’ प्रदर्शन 20 ते 23 मार्च 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, नंदुरबार आयोजित करण्यात आले असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी श्रीमती कांतागौरी बनकर यांनी कळविले आहे. या प्रदर्शनामध्ये स्थानिक महिलांनी तयार केलेले हस्तकला साहित्य, घरगुती उत्पादने, कृषीपूरक पदार्थ तसेच विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. नागरिकांना या वस्तू पाहण्याची आणि थेट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून महिला आणि शेतकरी बांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा मुख्य उद्देश आहे. हे प्रदर्शन चारही दिवस सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. केवळ प्रदर्शनीच नव्हे, तर दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीदेखील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या! पाहा! खरेदी करा! या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती बनकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande