
अकोला, 17 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी माना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे कुटुंबीयांसह गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपासात पोलिस हवालदार दिपक सोळंके आणि पो. कॉ. आगळते यांच्यासह सातत्याने तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार तसेच विविध ठिकाणांवरील संपर्कांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संबंधित तरुण व तरुणी यांनी स्वतःचे मोबाईल फोन बंद करून ठेवले होते, त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागणे अधिक कठीण झाले होते. तरीदेखील पोलिसांनी विविध मार्गांनी सातत्याने शोधमोहीम राबवत तपास सुरू ठेवला. सातारा, नागपूर आणि भंडारा या ठिकाणी जवळपास महिनाभर सातत्याने शोध घेतल्यानंतर संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागला. तपासादरम्यान ती भंडारा येथे एका आंतरजातीय तरुणासोबत राहत असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर माना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या दोघांना ताब्यात घेऊन संयमाने समजूत काढल्यानंतर तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच संबंधित युवकासही योग्य समज देण्यात आली. या प्रक्रियेमुळे कोणताही वाद न होता प्रकरण शांततेत मार्गी लागले.
माना पोलिसांनी संवेदनशीलतेने आणि संयमाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून ठाणेदार गणेश नावकार आणि माना पोलीस स्टेशनच्या कार्याचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. तरुणी सुरक्षितरित्या कुटुंबाकडे परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.हे.कॉ. दीपक सोळंके, पो.कॉ. सतीश आवडते यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे