
जळगाव, 17 मार्च, (हिं.स.) शेतीच्या शाश्वत विकासासाठी आणि जमिनीच्या आरोग्य संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाचा’ भव्य शुभारंभ दि. 19 मार्च रोजी अमळनेर येथील नवग्रह मंदिर येथे होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह जी चव्हाण प्रमुख उपस्थिती लाभणार असून देशभरातील नामवंत कृषीतज्ञ, प्रगतिशील शेतकरी आणि विविध कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अक्षय कृषी परिवाराच्या पुढाकारातून जळगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव आदी ठिकाणी प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. या बैठकींना शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली जात आहे.
बैठकांमध्ये शेतीत रासायनिक खते व कीटकनाशकांचा वाढता आणि अतिरेकी वापर यामुळे जमिनीची सुपीकता घटत चालल्याची गंभीर बाब अधोरेखित करण्यात आली. तसेच या रासायनिक द्रव्यांच्या अति वापरामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पद्धती, जमिनीचे पोषण आणि पर्यावरणपूरक कृषी तंत्रज्ञान यांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘भूमी सुपोषण अभियान’ाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि जनजागृती करून शेतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अमळनेर येथे होणारा मुख्य कार्यक्रम व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येत असून या माध्यमातून संपूर्ण देशात शेतीविषयक सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर