
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे ‘जल महोत्सव’ पंधरवड्याच्या निमित्ताने ‘जल अर्पण दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित या उपक्रमात ग्रामस्थांनी जलसंवर्धनाचा संकल्प केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर व कार्यकारी अभियंता दिनकर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जलसंवर्धन, पाणी बचत व स्वच्छ पाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावात जलदिंडी काढण्यात आली. ‘एकच नारा, पाणी काटकसर करा’, ‘पाणी हेच जीवन’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीचे व नळांचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाण्याचे महत्त्व, जलस्रोतांचे संवर्धन, परिसर स्वच्छता व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी व ग्रामस्थांनी जल प्रतिज्ञा घेत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य दिलीप काळदाते, उपअभियंता बी. डी. बार्शीकर, ग्रामपंचायत अधिकारी टी. के. साके, उपसरपंच ज्ञानेश्वर काळदाते, शाखा अभियंता मोईज खान, सृष्टी दिवसे, ओमप्रकाश लोखंडे, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis