
लातूर, 17 मार्च (हिं.स.) : लातूर तहसीलदारांनी स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन (SIR) प्रक्रियेबाबत 21 मार्च 2026 पर्यंतची मुदत जाहीर करून मतदारांना नोटीसद्वारे माहिती दिली आहे. मात्र, या प्रक्रियेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याबाबत सध्या मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मतदारांच्या म्हणण्यानुसार, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) हे दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहत नसून अनेकदा उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. विविध इतर कामांचा ताण असल्यामुळे BLO ना SIR प्रक्रिया व्यवस्थित पार पाडणे कठीण जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मतदारांच्या समाधानकारक सेवेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
दरम्यान, गुढी पाडवा, रमजान तसेच शनिवारच्या सुट्ट्यांमुळेही प्रक्रियेला विलंब होत असल्याचे चित्र आहे. अनेक मतदारांना 2002 च्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याची तक्रार आहे.
निवडणूक आयोगाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन राज्य, जिल्हा, मतदारसंघ, नाव आणि कॅप्चा टाकून आपली माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत माहिती पडताळणी केल्यास मतदान प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत, तसेच मतदार यादी अधिक पारदर्शक व अचूक राहण्यास मदत होईल.
मतदारांनी आपला मतदारसंघ, भाग क्रमांक आणि अनुक्रमांक तपासणे आवश्यक असून, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि अलीकडील पासपोर्ट फोटो यांसारखी कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, अचूक मतदार यादी ही मुक्त व निष्पक्ष निवडणुकांची मूलभूत अट आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिविजन अंतर्गत मतदार यादीचे पुनरावलोकन, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंदणी केली जाते.
या प्रक्रियेद्वारे निवडणुकीतील पारदर्शकता वाढवणे, दुबार नावे काढून टाकणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळवून देणे हे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये त्रुटी असल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशासनानेही मतदारांना आवाहन केले आहे की, 21 मार्चपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सहकार्य करावे, जेणेकरून आगामी निवडणुकांसाठी अचूक मतदार यादी तयार होऊ शकेल.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis