
परभणी, 17 मार्च (हिं.स.)। राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत, रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले. समाजातील वंचित घटक, ऊसतोड कामगार आणि वीटभट्टी मजुरांना प्राधान्याने अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले.
वंचित घटकांना रेशनकार्डचा लाभ मिळावा यासाठी सिग्नल आणि मंदिर परिसरात भिक्षा मागणाऱ्या व्यक्तींचा तातडीने सर्वे करून पात्र व्यक्तींना रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे. तसेच, प्रलंबित असलेल्या सर्व रेशनकार्डांचे वाटप पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व निरीक्षण अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये देण्यात आले. ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर आणि शेतमजुरांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ वेळेवर मिळतो की नाही, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खातरजमा करावी. यामध्ये कसूर आढळल्यास संबंधित यंत्रणेवर कडक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. अन्नसुरक्षा योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी जुन्या लाभधारकांची उत्पन्न पडताळणी करून पात्र शिधापत्रिका योजनेत ठेवण्याबाबत तसेच नव्याने पात्र लाभार्थी निवडण्याबाबत निर्देश श्री. ढवळे यांनी दिले. लोकसंख्येनुसार आवश्यक त्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकाने सुरू करावयाची असल्यास त्यासाठी प्रस्ताव शासनास सादर करून लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात नवीन रास्तभाव दुकाने मंजूर करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच स्वस्त धान्य दुकानांना नियमित भेटी देऊन लाभार्थ्यांना धान्याचा लाभ व्यवस्थितरित्या देण्यात येत असल्याची खात्री करण्यात यावी. रास्तभाव दुकानांत दरमहा ‘अन्न दिन’ साजरा करून त्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत धान्याच्या लाभाबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री. ढवळे यांनी बैठकीमध्ये दिल्या. बैठकीच्या समाप्तीनंतर तालुका परभणी अंतर्गत पात्र दिव्यांग व वंचित घटकांतील महिला लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण देखील करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis