
कोल्हापूर, 17 मार्च (हिं.स.) : वाढत्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि कार्यालयीन ताणतणावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच त्यांनी सर्व रोग निदान तपासणी व्हॅनला भेट देऊन उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गीता पिल्लई आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात स्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांची दंत, नेत्र, रक्त तपासणी, ईसीजी तसेच मौखिक कॅन्सर तपासणी करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ॲपल, नंदादीप, स्वास्तिक, जानकी आणि कोल्हापूर ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर या रुग्णालयांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमाचा सुमारे १६० हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar