
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : रायपाटण (ता. राजापूर) येथील होळी उत्सव बुधवारी, १८ मार्च रोजी शिंपण्याच्या कार्यक्रमासह उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या वेळी गावाची ग्रामदेवता श्री वाडची आई देवीची पालखी सजवून होळीच्या मांडावर ठेवली जाते. गावातील प्रत्येक वाडीतील घराघरात ही पालखी भेट देते. दररोज मांडावर घुमटासहित तमाशा, नृत्य आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. विशेष आकर्षण म्हणून पालखी नृत्य केले जाते. त्यामध्ये बाळगोपाल मोठ्या संख्येने सहभागी होता. उत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत गर्दी अधिक वाढते. बुधवारी शिंपण्याच्या दिवशी सायंकाळी होळीवरील रोंबट, जमिनीवरील रोंबट आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहेत. पहाटे उत्सवाची सांगता करून ग्रामदेवता श्री वडची आई देवीची पालखी मंदिराकडे मार्गस्थ होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी