
नाशिक , 17 मार्च (हिं.स.) राज्य सरकार प्रस्तावित करत असलेल्या धर्मातरविरोधी कायद्याबाबतही फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. हा कायदा कोणत्याही धर्माविरोधात नसून फसवणूक, दबाव किंवा प्रलोभन देऊन करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतील होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली की निवडणूक लढवावी लागली, तर भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक येथे भाजपा पदाधिकारी विजय चौधरी यांच्याकडे विवाह समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या किंवा फसव्या पद्धतीने घडणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्यासाठी ठरावीक प्रक्रिया पाळावी लागेल. संबंधित व्यक्तीने धर्मांतर करण्याच्या किमान ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी नोटीस देणे आवश्यक असेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीने अधिकाऱ्यांसमोर हजर राहून स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करत असल्याची साक्ष द्यावी लागेल. या प्रक्रियेमुळे जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन होणाऱ्या धर्मांतराला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य सरकार लवकरच या संदर्भातील विधेयकावर पुढील कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बारामती व राहुरी मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी विविध स्तरांवर चर्चा आणि समन्वयाचे प्रयत्न सुरू आहे, तथापि, जर या प्रयत्नांना यश आले नाही, तर भाजप निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV