
लातूर, 17 मार्च (हिं.स.)।ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या सीमारेषा, शेतरस्ते व मालकी हक्कांवरून उद्भवणारे वाद कमी करण्यासाठी लातूर पोलिसांनी “पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर” हा अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील वादांना थेट घटनास्थळी जाऊन सामोपचाराने तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम १६ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आला. ग्रामीण भागात छोट्या कारणांवरून निर्माण होणारे वाद अनेकदा गंभीर स्वरूप धारण करून न्यायालयीन प्रक्रियेत अडकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी मानवी दृष्टीकोनातून संवाद व सामोपचाराच्या माध्यमातून वाद सोडविण्याचा मार्ग स्वीकारला आहे.या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचारी थेट गावात जाऊन वादग्रस्त शेतजमिनीवर भेट देतात. दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. महसूल विभागाच्या नोंदींचा आधार घेत गावातील प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्ती समिती सदस्य व ज्येष्ठ व्यक्ती यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने वाद सोडविण्यात येतात.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून १७ मार्च रोजी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी भातखेडा येथे प्रत्यक्ष भेट देत मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला शेती सीमारेषेचा वाद निकाली काढला. शिवराज धोंडीराम आचवले यांच्या जमिनीशी संबंधित हा वाद दोन्ही पक्षकारांना एकत्र बसवून, कागदपत्रांची पडताळणी करून आणि प्रत्यक्ष शेतात मोजमाप करत सामोपचाराने सोडविण्यात आला. दोन्ही पक्षकारांनी समाधान व्यक्त करत भविष्यात वाद निर्माण न करण्याचे मान्य केले.“पोलीस हे केवळ गुन्हे दाखल करणारे यंत्र नसून समाजातील तणाव कमी करणारे व विश्वास निर्माण करणारे माध्यम असावे,” या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
हा उपक्रम पुढील काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून, तक्रारी असलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. पोलीस पथकांसोबत महसूल विभागातील अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच गावातील तंटामुक्ती समिती व प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहभागातून प्रलंबित वाद निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी जमिनीशी संबंधित वाद वाढण्यापूर्वीच पोलीस प्रशासनाकडे मांडावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis