
रायगड, 17 मार्च (हिं.स.) : ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या उमेद–महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “मिनी सरस” महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगतच्या मैदानावर होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी दिली.
उद्घाटन प्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दि. २० ते २४ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल, विक्री व प्रात्यक्षिके हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे.कार्यक्रमाचे वेळापत्रकही आकर्षक ठेवण्यात आले आहे. उद्घाटनदिनी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच महिलांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. २१ मार्च रोजी शेतकरी मेळावा व मार्गदर्शन, २२ मार्च रोजी “लखपती दीदी” कार्यशाळा तसेच “खेळ पैठणीचा” आणि “गवळण” लोकनृत्याचे कार्यक्रम रंगणार आहेत.
२३ मार्च रोजी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचा “ऑर्केस्ट्रा शिवतीर्थ” हा हिंदी व मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तर २४ मार्च रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा, महा आवास अभियान व “माझी वसुंधरा” अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण होऊन समारोप केला जाणार आहे.
समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री रंजना काळे उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांच्या विविध उत्पादनांचा मेळा, प्रशिक्षण कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचा समावेश असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)