गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक वाढली
नागरिकांच्या बँक खात्यांवर सायबर चोरट्यांचा डोळा छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ होत असताना गॅस बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. सायबर गुन्हेगार विविध मार्गांचा वापर करून नागर
गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक वाढली


नागरिकांच्या बँक खात्यांवर सायबर चोरट्यांचा डोळा

छत्रपती संभाजीनगर, 17 मार्च (हिं.स.)। गॅस सिलेंडरच्या मागणीत वाढ होत असताना गॅस बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढू लागले आहेत. सायबर गुन्हेगार विविध मार्गांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले आहे. फोन कॉल, बनावट वेबसाइट, सोशल मीडियावरील संदेश किंवा व्हॉट्सअॅप लिंकच्या माध्यमातून नागरिकांना गॅस बुकिंग किंवा सबसिडी अपडेट करण्याचे आमिष दाखवले जात आहे. नागरिकांनी निष्काळजीपणे दिलेल्या माहितीचा फायदा घेत सायबर चोरटे काही मिनिटांतच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढत आहेत.

सायबर गुन्हेगार सर्वप्रथम गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे सांगून ग्राहकांशी संपर्क साधतात. “तुमची गॅस सबसिडी अपडेट करायची आहे”, “गॅस बुकिंग कन्फर्म करायची आहे” किंवा “तुमचा गॅस कनेक्शन बंद होणार आहे” अशा कारणांवरून नागरिकांना घाईगडबडीत माहिती देण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तीला मोबाईलवर एक लिंक पाठवली जाते किंवा काही वेळा अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही लिंक किंवा अॅप प्रत्यक्षात बनावट असते. त्यावर ग्राहकाने मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, एटीएम कार्ड क्रमांक किंवा ओटीपी टाकताच सायबर गुन्हेगारांना खात्याचा प्रवेश मिळतो.

त्यानंतर काही मिनिटांतच ग्राहकांच्या बँक खात्यातून हजारो ते लाखो रुपयांची रक्कम काढली जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक नागरिकांना पैसे कापल्यानंतरच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत कमी माहिती असलेल्या लोकांना या प्रकारात अधिक लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सायबर फसवणूक रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगार लोकांच्या भीतीचा आणि तातडीच्या परिस्थितीचा फायदा घेतात. “गॅस कनेक्शन बंद होईल”, “बुकिंग रद्द होईल” किंवा “सबसिडी थांबेल” असे सांगून ग्राहकांना लगेच कृती करण्यास भाग पाडले जाते. अशा वेळी अनेक जण तपास न करता दिलेल्या लिंकवर क्लिक करतात किंवा ओटीपी शेअर करतात. मात्र बँक किंवा गॅस एजन्सी कधीही फोनवरून ओटीपी किंवा बँक तपशील मागत नाही, हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. गॅस बुकिंगसाठी नेहमी अधिकृत अॅप, अधिकृत वेबसाइट किंवा थेट गॅस एजन्सीचा संपर्क क्रमांक वापरणे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. अज्ञात क्रमांकावरून आलेले कॉल, संशयास्पद लिंक किंवा अनोळखी व्यक्तीकडून आलेले संदेश यावर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, एटीएम कार्ड तपशील, सीव्हीव्ही क्रमांक किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड देऊ नये.

तसेच मोबाईलवर आलेल्या लिंकवर क्लिक करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेक वेळा बनावट वेबसाइट अधिकृत वेबसाइटसारखीच दिसते, त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होते. अशा परिस्थितीत वेबसाइटचा पत्ता नीट तपासणे आणि अधिकृत स्रोतांद्वारेच व्यवहार करणे महत्त्वाचे ठरते. कोणतीही आर्थिक माहिती देण्यापूर्वी संबंधित कॉल किंवा संदेशाची खातरजमा करणे आवश्यक आहे.

--

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande