
नाशिक, 17 मार्च (हिं.स.) : इंदिरानगर येथील राजराजेश्वरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या जमिनीवर नियमांचे उल्लंघन करून तब्बल 12 कोटी रुपयांचा टीडीआर मंजूर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने नाशिक महापालिकेत खळबळ उडाली आहे.
स्थायी समिती सदस्य तथा शिंदेसेनेच्या नगरसेविका किरण दराडे गामणे यांनी हा आरोप करताना सांगितले की, संबंधित जमिनीवर यूएलसी कायदा, डीपी रस्ता व इतर आरक्षण लागू असतानाही आवश्यक मंजुरी न घेता हा व्यवहार करण्यात आला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकरणाची दीड महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मंगळवारी (17 मार्च) पार पडलेल्या स्थायी समिती सभेत सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली हा मुद्दा चर्चिला गेला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, करिष्मा नायर, शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
गामणे यांनी नमूद केले की, सुमारे 39,500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या जमिनीतील अतिरिक्त भागाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. विशेष म्हणजे, अतिरिक्त जमीन शासनाच्या ताब्यात असतानाही तिचा व्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला. नियमांनुसार अशा जमिनीवर टीडीआर लागू होत नसतानाही अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणात संबंधित अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी आणि व्यवहारात सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नदीपात्रातील बांधकामावर आक्षेप
सभेत सदस्य राहुल दिवे यांनी एसटीपी प्रकल्पासाठी नदीपात्रात होणाऱ्या बांधकामावर आक्षेप घेतला. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती सानप यांनी संबंधित ठिकाणांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
अग्निशमन विभागाबाबत चिंता
निवृत्ती वयवाढीचा प्रस्ताव
शहरातील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या बंद अवस्थेत असल्याचेही सभेत निदर्शनास आणण्यात आले. यासोबतच मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांच्या निवृत्तीपूर्वी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली.तसेच, मनपातील वर्ग 2 व 3 अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.याशिवाय, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना 10 लाख रुपयांखालील कामे ऑफलाईन विना निविदा पद्धतीने देण्याचा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV