
परभणी, 17 मार्च (हिं.स.) : “आपले प्रत्येक कर्म हे भगवंताची पूजा असावे. 24 तास केली जाणारी सर्व कर्मे निष्काम व शुद्ध असावीत, कारण निष्काम कर्म सेवा हीच खरी पूजा आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांनी केले.
मंगळवार, 17 मार्च रोजी आयोजित महाभारत संदेश कथा या सहा दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी त्यांनी हे विचार मांडले. अलंकापुरी नगरीत पार पडलेल्या फिरत्या ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात बोलताना त्यांनी महाभारताच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले.
स्वामीजी म्हणाले की, पांडवांचा राज्याभिषेक म्हणजे शाश्वत जीवनमूल्यांची स्थापना होय. “मानवी जीवन हा एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षाला कसे सामोरे जावे, याचे उत्तम मार्गदर्शन महाभारत या ग्रंथातून मिळते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ज्यांना माणसांचे गुण-दोष ओळखता येतात, तीच माणसे खऱ्या अर्थाने सुखी होतात. “ज्याला माणूस समजतो, त्याला इतरांशी कसे वागावे हेही समजते. या जगातून आपण काहीही घेऊन जाणार नाही, त्यामुळे कोणालाही विनाकारण दुखवू नये,” असा संदेश त्यांनी दिला.
प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान रुजले पाहिजे आणि संतांच्या शिकवणीनुसार जीवन जगले पाहिजे, असे आवाहन करत त्यांनी “समृद्ध जीवनासाठी आपण सर्वांनी ज्ञानोबा-तुकारामांचे खरे पाईक व्हावे,” असेही सांगितले.
सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचा समारोप चैतन्यमय वातावरणात झाला. भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि आध्यात्मिक तेज स्पष्ट दिसून येत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय पिंपळगावकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उद्योजक जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis