
नाशिक, 17 मार्च (हिं.स.) महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील 'ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल'च्या वतीने टाटा मोटर्स (पुणे) यांच्या सहकार्याने भव्य 'ओपन कॅम्पस प्लेसमेंट' मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या प्रसंगी टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक . नितीन कदम आणि एच.आर. मॅनेजर राजेश रोकडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ७२ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड (Shortlist) करण्यात आली. मुलाखतींच्या प्रक्रियेनंतर २६ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये इंटर्नशिपसाठी अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले. एच.आर. मॅनेजर श्री. राजेश रोकडे यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे स्वरूप, जबाबदाऱ्या, कामाच्या वेळा, मानधन, वाहतूक आणि भोजनाच्या सोयींबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या समन्वयक प्रा.मधुरा जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे सदस्य डॉ. संतोष चोबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. याप्रसंगी ओ.जे.टी. आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. जी. एम.गांगुर्डे, यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV