
पालघर, 17 मार्च, (हिं.स.) - सफाळे पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी निसर्गवासी कालूराम काका दोधडे उड्डाणपूल ३ मार्च २०२५ रोजी सुरू करण्यात आला असला, तरी पादचाऱ्यांच्या सोयीचा पूर्णपणे विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे. वाहनचालकांसाठी दिलासा ठरलेल्या या उड्डाणपुलामुळे पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवीन उड्डाणपूल सुरू करताना रेल्वे प्रशासनाने गेट क्रमांक ४० कायमस्वरूपी बंद केला आहे. पूर्वी नागरिक सहजपणे रेल्वे फाटक ओलांडून दैनंदिन कामांसाठी ये-जा करत होते. मात्र आता कोणताही पर्यायी मार्ग, पादचारी पूल किंवा फूटओव्हर ब्रिज उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
सफाळे पूर्व भागात बाजारपेठ, शाळा, सरकारी कार्यालये तसेच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. दररोज अनेक विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार पायी प्रवास करतात. मात्र उड्डाणपूल केवळ वाहनांसाठीच सोयीचा ठरत असून पादचाऱ्यांसाठी तो धोकादायक आणि त्रासदायक बनला आहे. विशेषतः आजारी व्यक्ती, महिलांना किंवा हातात सामान असलेल्या नागरिकांना पुलावरून जाणे अत्यंत कठीण ठरत आहे.दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून पादचारी पूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL