
सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर आता लवकरच होणार सुनावणीअमरावती, 18 मार्च (हिं.स.) एमआयएमच्या बडनेरा येथील नगरसेविका मीरा कांबळे यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवरील याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी मंगळवार, १७ मार्च रोजी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या दालनात नियोजित होती.
कांबळे यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सुनावणीसाठी अधिक वेळ मागितल्याने ती पुढे ढकलण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कापडणीस यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.कापडणीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या काही दिवसांत घेतली जाईल.एमआयएमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मीरा कांबळे यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले होते.वास्तविक पाहता, एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तसा पक्षादेश (व्हीप) देखील बजावला होता. कांबळे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी एमआयएमने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी