
-मेक्सिकोमध्ये सामने आयोजित करण्याबाबत इराणची फिफासोबत चर्चा सुरू
नवी दिल्ली, 18 मार्च (हिं.स.) । फिफा विश्वचषक-२०२६ मध्ये इराणच्या सहभागााची शक्यता कमी आहे. वाढत्या सुरक्षा चिंतेमुळे, अमेरिकेत नियोजित असलेले सामने मेक्सिकोमध्ये हलवण्यासाठी इराणचे फुटबॉल महासंघ फिफासोबत चर्चा करत आहे. इराणचे फुटबॉल अध्यक्ष मेहदी ताज यांनी याला दुजोरा दिला असून, सुरक्षेची हमी हा एक मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
मेक्सिकोमधील इराणी दूतावासाच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ताज म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी राष्ट्रीय संघाच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नसल्याचे सांगितल्यामुळे, आम्ही निश्चितपणे अमेरिकेत जाणार नाही. इराणचे विश्वचषक सामने मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यासाठी आम्ही फिफासोबत चर्चा करत आहोत.
फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या इराणवरील अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यांनंतर सुरू असलेल्या संघर्षामुळे या चिंता निर्माण झाल्या आहेत. या हल्ल्यांमुळे प्रादेशिक तणाव वाढला आहे. इराणच्या क्रीडा मंत्र्यांनी यापूर्वी परिस्थितीचे गांभीर्य दर्शवत म्हटले होते की, राष्ट्रीय संघ नियोजित वेळेनुसार स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की इराणला सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल, पण त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्यही मान्य केले होते. त्यांनी सांगितले की, संघाचे स्वागत आहे, पण त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी अमेरिकेत खेळणे योग्य ठरणार नाही, असेही ते म्हणाले.
अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या ४८ संघांच्या मोठ्या स्पर्धेसाठी इराण सहजपणे पात्र ठरला होता. २५ मार्च २०२५ रोजी, इराण विश्वचषकात स्थान मिळवणारा पहिला आशियाई संघ ठरला होता. सध्याच्या वेळापत्रकानुसार, त्यांचे दोन गट सामने लॉस एंजेलिसमध्ये आणि एक सिएटलमध्ये होणार आहेत. पण, बिघडत चाललेली परिस्थिती पाहता, इराणने अचानक स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता वाढली आहे. जर इराणने माघार घेतली, तर फिफाला शेवटच्या क्षणी पर्यायी संघाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पण, आशियाई फुटबॉल महासंघाचे म्हणणे आहे की, त्यांना अद्याप इराणच्या स्पर्धेतून माघार घेण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. इराणी महासंघाने सहभागी होण्याचा आपला इरादा निश्चित केला आहे, पण वेगाने बदलणारी परिस्थिती त्यांच्या अंतिम निर्णयाबद्दल अजूनही अनिश्चितता निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे