येवदा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; सरपंच नावापुरते, सदस्यच चालवत असल्याचा आरोप
अमरावती, 18 मार्च (हिं.स.)। दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या येवदा ग्रामपंचायतीत विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये तीव्र नारा
येवदा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार; सरपंच नावापुरते, ग्रामपन्चायत सदस्य चालवत असल्याचा आरोप


अमरावती, 18 मार्च (हिं.स.)।

दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या येवदा ग्रामपंचायतीत विकासकामांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गावातील मोक्षधाम परिसरात सर्वत्र घाण साचलेली असून साफसफाईची कोणतीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी ग्रामपंचायतीचा एकही कर्मचारी नियमितपणे जात नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपतालुकाप्रमुख राजेंद्र मानकर यांनी स्वतः पुढाकार घेत मोक्षधाम परिसरात जाऊन हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्यांच्या या कृतीमुळे ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतानाही मोक्षधामसारख्या अत्यावश्यक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात अपयश येत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना स्वतः स्वच्छता करावी लागणे ही ग्रामपंचायतीसाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीका होत आहे.

यावेळी राजेंद्र मानकर यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना इशारा देत, “मोक्षधाम येथे तात्काळ सफाई कर्मचारी नियुक्त करावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असे स्पष्ट केले.

या प्रकारामुळे येवदा ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande