
नाशिक, 18 मार्च, (हिं.स.)। मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र झाल्याने जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचे धरण मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पातळीत घट होत आहे. जिल्ह्यातील समूहात ३९,३५५ दलघफू म्हणजे ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील उन्हाच्या झळांनी झपाट्याने पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसणार नाही अशी आशा होती. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण समूहात ८ टक्के अधिक साठा शिल्लक असल्याने मागील वर्षीप्रमा यंदाही एप्रिल व मे महिन्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३,६६७दलघफू म्हणजे ६५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा अधिक वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी दिवसागणिक पाणीपातळीत घट होत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाची दाहकता अधिक असून, नाले, ओढे कारडे पडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील चार गावांचे टँकरसाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच टैंकरफेऱ्या सुरू होणार आहेत.
प्रमुख धरण समूहातील पाणीसाठा
गंगापूर धरण समूहात ७,०७६ दलघफू म्हणजे ६९.६० टक्के, पालखेड धरण समूहात ४,०२९ दलघफू म्हणजे ४८.३९, ओझरखेड धरण समूहात २०,१८ दलघफू म्हणजे ६२.९१, दारणा धरण समूहात १३,५३१ दलघफू म्हणजे ५६.७२ टक्के, भोजापूर-२५७ दलघफू म्हणजे ७१.१९ टक्के, गिरणा खोरे समूह ११,३४३ दलघफू म्हणजे ४९.४८ टक्के, पुनंद धरण समूहात १,१०१ दलघफू म्हणजे ६७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV