मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये भीषण आग; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
इंदोर, 18 मार्च (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या इंदूर येथील बृजेश्वरी ऍनेक्स या निवासी भागात एका घराला भीषण आग लागून 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरुवातीला मृतांची संख्या 7 असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र बचावकार्यादरम्यान एका लह
इंदोरमध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला ती इमारत


इंदोर, 18 मार्च (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या इंदूर येथील बृजेश्वरी ऍनेक्स या निवासी भागात एका घराला भीषण आग लागून 8 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरुवातीला मृतांची संख्या 7 असल्याचे सांगण्यात येत होते, मात्र बचावकार्यादरम्यान एका लहान मुलाचा मृतदेहही आढळून आल्याने मृतांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगला लावले होते. चार्जिंग पॉइंटमध्ये स्फोट झाल्याने आग लागली आणि ती वाहनातून घरात पसरली. घरामध्ये 10 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर ठेवले होते, त्यापैकी काही सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिक भडकली.ही इमारत मनोज पुगलिया यांची असल्याचे सांगण्यात आले आहे. ते पॉलिमर व्यवसायाशी संबंधित होते. घरामध्ये काही ज्वलनशील रसायनेही साठवून ठेवली होती, ज्यामुळे आगीची तीव्रता वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, सकाळी अचानक आरडाओरडा ऐकू आल्यावर ते बाहेर आले असता घराला आग लागलेली दिसली. त्यांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. काही नागरिकांनी बादल्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत आग संपूर्ण घरभर पसरली होती.या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृत्यूमुखी पडलेले सर्वजण आगीत जिवंत होरपळल्याची माहिती समोर आली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande