
मुंबई, 18 मार्च (हिं.स.)। ऑडी इंडियाने भारतात आपली नवीन ऑडी एसक्यू८ ही लक्झरी एसयूव्ही लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.७८ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही एसयूव्ही कंपनीच्या क्यू८ लाइनअपचा भाग असून ऑडी Q8 आणि ऑडी RS Q8 यांच्या मधोमध स्थान मिळवते.
नवीन एसक्यू८ मध्ये ४.०-लिटर ट्विन-टर्बो व्ही८ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ५०७ बीएचपी पॉवर जनरेट करते आणि ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही गाडी ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीमसह सुसज्ज आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही एसयूव्ही फक्त ४.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग गाठू शकते, तर टॉप स्पीड २५० किमी प्रति तासपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.
डिझाइनच्या बाबतीत, एसक्यू८ मध्ये कूपे-स्टाइल एसयूव्ही लूक कायम ठेवण्यात आला असून अधिक स्पोर्टी अपील देण्यात आले आहे. पुढील बाजूस मोठी सिंगल-फ्रेम ग्रिल, शार्प एलईडी हेडलॅम्प्स आणि मोठे एअर इनटेक्स दिले आहेत. गाडीला सिल्व्हर अॅक्सेंट्समुळे अधिक आक्रमक लूक मिळतो. साइड प्रोफाइलमध्ये स्लोपिंग रूफलाइन, २2-इंच मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स आणि ‘एस’ बॅजिंग यामुळे ती वेगळी ओळख निर्माण करते.
इंटीरियरमध्ये प्रीमियम लेदर आणि अल्कांतारा अपहोल्स्ट्री वापरण्यात आली आहे. डॅशबोर्डवर ट्विन-स्क्रीन एमएमआय इंफोटेनमेंट सिस्टीम आणि १२.३-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय बँग अँड ओलुफसेन ऑडिओ सिस्टीम, पॅनोरमिक सनरूफ, पॉवर्ड सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा असे आधुनिक फीचर्स दिले आहेत. सेफ्टीसाठी लेव्हल-२ एडीएएस तंत्रज्ञानही समाविष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule