
चंद्रपूर, 18 मार्च (हिं.स.)।ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रस्त्यांच्या कडेला असलेले ऐतिहासिक 'उंच खांब' हे ब्रिटिश किंवा गोंड राजांनी बांधलेले नसून भोसले राजांनी बांधले आहेत असा दावा भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दगडी वा उंच खांब रस्त्याच्या कडेला उभे असलेले पाहायला मिळतात. हे खांब इतिहासाचे मूक साक्षीदार म्हणून आजही टिकून आहेत. वनविभागाने यापैकी काही खांबांचे संवर्धन केले आहे. ह्यातील बहुतेक खांब तुटले असले तरी ताडोबात ते दृष्टीस पडतात.
चंद्रपूर ते ताडोबा तलावापर्यंत ते वाळूच्या दगडापासून बनविल्या गेले असून पुढे नागपूरसाठी काही खांब विटांपासून बनविले गेले आहेत. खांबाच्या वर यू आकाराचे दगड मांडलेले आहेत. हे दगड पुढील खांबाकडे दिशा दाखविण्यासाठी विशेषत: तयार केली असून क्वचित प्रसंगी त्याचा उपयोग वन्यजीव सुरक्षेसाठी दोरी आणि घंटा बांधण्यासाठी केल्या जात असावा.अशी माहिती प्रा. सुरेश चोपणे यांनी गोंड, ब्रिटिश आणि भोसले काळाचा अभ्यास केल्यानंतर दिली असल्याचे नमूद केले आहे.चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्या - येण्यासाठी भोसले राजांनी बांधले आहेत असेही त्यांनी नमूद केले.
ब्रिटिश प्रत्येक बांधकामाची बिले, माहिती लिहून ठेवत असत. पण खांबांची माहिती चंद्रपूर गॅझेटियर मध्ये किंवा आर्थिक अहवालात प्रकाशित झालेली नाही. ताडोबाच्या काही वेबसाईटवर गोंड कालीन खांब असल्याचे अनेक पर्यटन संस्थांनी अंदाचे म्हटले आहे. परंतु सर्व राजांचा शास्त्र शुद्ध अभ्यास केल्यानंतर चंद्रपूर ते नागपूर येथे जाण्यासाठी भोसले ह्यांनी हे खांब बांधल्याचे पुरावे मिळालेले असल्याचे चोपणे यांनी म्हटलेले आहे.
हे खांब भोसले राजांनी (१७५१- १८५३) चंद्रपूरला येण्या जाण्यासाठी बांधले होते. चंद्रपूर - ताडोबा - चिमूर - उमरेड - नागपूर असा हा प्रवास असायचा. दाट जंगलात १०० मीटर अंतरावर असे खांब बांधले जायचे. पूर्वी शेकडो खांब बांधले गेले. परंतु ताडोबात ती ३५ दगडांची आणि ९ विटांची उपलब्ध आहे. उमरेड जवळ एक आढळली. परंतु नागपूरकडील अनेक पडली आहेत. आज उपलब्ध असली तरी त्यात विटांनी बांधलेली सुद्धा आहेत.परंतु पुढे ती तुटली ,पडली आणि नष्ट झाली. त्यांची उंची जवळ जवळ १५ फूट आणि खाली जाड जवळ जवळ २.५ फूट आणि दोन खांबातील अंतर १०० मीटर आहे. उमरेडजवळ सुद्धा एक खांब दोन वर्षापूर्वी सापडला होता.संशोधना नंतर पुन्हा सापडेल.
दरम्यान ताडोबातील खांब हे ब्रिटिशांनी बांधले, ह्याची माहिती चंद्रपूर गॅझेटियर मध्ये चुकीने दिले गेले असल्याने ते बदलून भोसले ह्यांनी बांधले असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी इतिहास अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी केली आहे.
गोंड राजे - हे नेहमी इतर राज्यांचे हस्तक राहून राज्य करीत होते. नागपूर चे गोंड राजे चंद्रपूर ला आणि चंद्रपूर चे नागपूर ला येत जात नसत.मात्र चंद्रपूर चे गोंड राजे हे सातत्याने चंद्रपूर,कळंब आणि माहूर येथेच राज्य करीत होते.ते नागपूर येथे कधीच जात येत नसे.
भोसले राजे- कान्होजी भोसले ह्यांनी १७४२ पासून नागपूर येथे राज्य सुरू केले. पुढे १७५५ मध्ये नागपूरला सत्ता सुरू केली. रघुजी भोसलेंनी पुणे येथून नागपूर येथे आणि चंद्रपूर येथे आक्रमन करून गोंड राज्यावर १०० वर्षे राज्य केले. चंद्रपूर हे मुधोजी ला देण्यात आले. त्यांनी ३२ वर्षे राज्य केले. त्यानंतर मुलगा व्यंकोजीने राज्य केले. रघुजीने चंद्रपूरच्या नीलकंठ शहाचा १७४८ मध्ये पराभव केला. नागपूर ते चंद्रपूर येथे सतत यावे लागत असे.
त्यामुळे त्यांनी नागपूर ते ताडोबा आणि चंद्रपूर येथे येण्यासाठी हा मार्ग निवडला. चंद्रपूर आणि सावली येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सुती वस्तू, कपडे तयार केले जात होते, हा व्यापार नागपूर येथे चालू करावा ह्यासाठी चंद्रपूर - नागपूर रस्ते व्हावे म्हणून भोसलेंनी प्रयत्न केला. लोकांना, भोसलेना आणि राजकीय लोकांना रस्ते दिसावे ह्यासाठी दगडी आणि विटाचे खांब उभारले गेले. विशेष म्हणजे भोसले हेच विटांचा वापर करीत असे. इंग्रज आणि गोंड राजे केवळ दगडी इमारती उभारीत असे. पुढे ब्रिटिशांनी रघुजी भोसले-३ ह्यांचा शंभर वर्षानंतर पराभव केला होता आणि चंद्रपूर, नागपूर येथे राज्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव