
छत्रपती संभाजीनगर, 18 मार्च, (हिं.स.)। महिला आर्थिक विकास महामंडळ (माविमं)मार्फत स्थापन महिला बचतगटांच्या विविध उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार दि.२० पासून जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती माविमंचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी दिली आहे.
पैठण शहरातील नगर परिषद वाहन तळ, बाहेरील नाथ मंदिर, खंडोबा मंदिराच्या बाजूला हा मेळावा दि.२० ते २३ दरम्यान होणार आहे.या मेळाव्यात माविमं मार्फत स्थापन करण्यात आलेल्या व लोकसंचलित साधन केंद्रांतर्गत कार्यरत गटांची उत्पादने ग्राहकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील तसेच खरेदीही करता येतील. मेळाव्यात बचतगटांचे सुमारे ५० स्टॉल्स असतील. तसेच लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचीही उपस्थिती असेल. या मेळाव्यात महिला बचतगटांना कर्जवाटप केले जाणार आहे. उद्योजक महिलांचा सन्मान, उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांच्या संयुक्त बैठका, महिलांची हिमोग्लोबिन तपासणी असे विविध उपक्रमही होणार आहेत. या प्रदर्शनात वाळवणाचे पदार्थ, विविध घरगुती पदार्थ, पापड, शेवया, तूप, लोणची इ. विविध दैनंदिन वापराच्या वस्तूंची उपलब्धता असणार आहे.
जिल्ह्यात माविमंचे २२०३ बचत गट
जिल्ह्यात माविमं मार्फत २२०३ महिला बचत गट स्थापन करण्यात ऋआले असून २२ हजार ८७० महिलांचे संघटन तयार करण्यात आले आहे. या महिला बचत गटांना आतापर्यंत ३३४ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहितीही चंदनसिंग राठोड यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis