
सोलापूर, 18 मार्च (हिं.स.)। उन्हाचा तडाखा वाढल्याने उजनी धरणातून शेतीसाठी पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन आता मुख्य कालव्यातून तीन हजार क्युसेक आणि भीमा-सीना जोड कालव्यातून (बोगदा) नऊशे क्युसेकने पाणी सोडले आहे. हे पाणी पुढे ८० दिवस सुरु राहणार आहे. धरणात सध्या ९४.६० टीएमसी पाणीसाठा आहे.उजनी धरणात सध्या ३१ टीएमसी (५७.८० टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा २८ टक्के पाणीसाठा अधिक आहे. शेतीसाठी सोडलेले हे पाणी शेतकऱ्यांसाठी अडीच महिने (मेअखेर) सलग सोडले जाणार आहे. पुढे जूनमध्ये पावसाळा सुरु होतो, पण यंदाच्या वर्षी कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन पुढे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड