समृद्धीवर पहिले सीएनजी स्टेशन: मे-पासून शिवणी येथे वाहनचालकांना मोठा दिलासा
अमरावती, 18 मार्च (हिं.स.)। मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनचालकांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, अदानी टोटल गॅसकडून पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. नागपूरवरून मुंबईकडे जाताना अमरावती जिल्ह्यातील शिव
समृद्धीवर पहिले सीएनजी स्टेशन: मेपासून शिवणी येथे वाहनचालकांना मोठा दिलासा


अमरावती, 18 मार्च (हिं.स.)। मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहनचालकांसाठी दिलासादायक पाऊल उचलण्यात आले असून, अदानी टोटल गॅसकडून पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. नागपूरवरून मुंबईकडे जाताना अमरावती जिल्ह्यातील शिवणी परिसरातील एचपीसीएल पंपावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.समृद्धी महामार्ग सुरू होऊन तीन वर्षे उलटली असली तरी आतापर्यंत या ७३८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकही सीएनजी स्टेशन नव्हते. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून सीएनजीला मोठी मागणी आहे. त्यामुळे या नव्या सुविधेमुळे CNG वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे.शिवणी येथील या स्टेशनवर २४ तास सीएनजी पुरवठा उपलब्ध राहणार असून, चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी येथील मदर स्टेशनवरून गॅस पुरवठा केला जाणार आहे. सध्या अमरावती परिसरात सीएनजीचा दर सुमारे ९४ रुपये प्रति किलो आहे.

दरम्यान, अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये मिळून २२ सीएनजी फिलिंग स्टेशन कार्यान्वित आहेत. यामध्ये अमरावतीत ८, हिंगोलीत ७, अकोल्यात ३, यवतमाळात ३ आणि वाशिममध्ये १ स्टेशनचा समावेश आहे.अदानी टोटल गॅसचे विदर्भ प्रमुख योगेशकुमार पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात पहिले स्टेशन सुरू झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत आणखी पाच सीएनजी स्टेशन समृद्धी महामार्गावर उभारण्याचे नियोजन आहे. विशेषतः नागपूर ते बुलढाणा दरम्यान दोन्ही बाजूंनी ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक किफायतशीर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande