अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात 'उष्माघात नियंत्रण कक्ष' कार्यान्वित
लातूर, 18 मार्च (हिं.स.)। शहरासह तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, ही गंभीर बाब ओळखून शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे विशेष ''उष्माघात
अहमदपूर


लातूर, 18 मार्च (हिं.स.)। शहरासह तालुक्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून, ही गंभीर बाब ओळखून शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे विशेष 'उष्माघात नियंत्रण कक्ष' कार्यान्वित करण्यात आला आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात विशेष बेड, कुलर आणि मुबलक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तीन तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम २४ तास तैनात करण्यात आली आहे. रुग्णालयात सर्व आवश्यक जीवनरक्षक औषधे आणि ओआरएस (ORS) पाकिटांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.

तालुक्यातील वाढते तापमान पाहता डॉ. नागरगोजे यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी शक्यतो सकाळी लवकर कामावर जावे आणि दुपारी उन्हाची तीव्रता असताना घराबाहेर पडणे टाळावे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर रुमाल किंवा टोपी वापरावी आणि अंगावर पूर्ण कपडे ठेवावेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये यासाठी वारंवार पाणी प्यावे. थकवा येईल अशी कष्टाची कामे उन्हात करणे टाळावे. चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित झाडाच्या सावलीत बसावे. परिस्थिती गंभीर असल्यास १०८ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ग्रामीण रुग्णालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे त्यांनी कळवले आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही व्यवस्था अत्यंत दिलासादायक ठरणार असून, उष्माघाताची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार केले जातील, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande