पश्चिम बंगाल : निवडणुकीपूर्वी 13 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
कोलकाता, 18 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंत
निवडणूक आयोग लोगो


कोलकाता, 18 मार्च (हिं.स.) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता 13 जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकाऱ्यांची) नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, या अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. हे अधिकारी आता जिल्हास्तरावर निवडणुकीच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवणार असून, निष्पक्ष आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.नवीन नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये जितिन यादव ( कूचबिहार), संदीप घोष ( जलपाईगुडी), विवेक कुमार ( उत्तर दिनाजपूर), राजनवीर सिंह कपूर ( मालदा), आर. अर्जुन ( मुर्शिदाबाद), श्रीकांत पल्ली ( नदिया), श्वेता अग्रवाल ( पूर्व वर्दवान), स्मिता पांडे ( उत्तर कोलकाता), रणधीर कुमार ( दक्षिण कोलकाता),शिल्पा गौरीसरिया ( उत्तर चोवीस परगणा), अभिषेक कुमार ( दक्षिण चोवीस परगणा), हरिशंकर पनिकर (दार्जिलिंग) आणि टी. बालासुब्रमण्यम ( अलीपुरदुआर) यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की हे सर्व बदल तात्काळ लागू होतील. सर्व अधिकाऱ्यांनी गुरुवारी 19 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्या नव्या पदावर रुजू झाल्याची खात्री द्यावी लागेल. तसेच, ज्यांची बदली करण्यात आली आहे त्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही निवडणुकीसंबंधी काम दिले जाणार नाही.

याशिवाय, आयोगाने राज्यातील 5 पोलीस रेंजमध्येही नवीन डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रायगंज, मुर्शिदाबाद, बर्धमान, प्रेसीडेंसी आणि जलपाईगुडी रेंजमध्ये हे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना 19 मार्च सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये यंदा 2 टप्प्यांत मतदान होणार असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल. निकाल 4 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आयोगाने हे मोठे प्रशासकीय बदल केले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande